दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळं 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत.
आत्तापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘इतके’ कोटी जमा..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या DBT योजनेपैकी एक योजना आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहेत. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. तसेच त्याच दिवशी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.
एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू केली होती. पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट हस्तांतरित केले जाणार आहेत. जेणेकरून त्यांना महागड्या बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळेल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
ई-केवायसी असणार गरजेचे..
पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध असूनयाशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.