पालनपूर: 1996 च्या पालनपूर नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची सश्रम कारावास आणि 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पालनपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी बुधवारी या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना बुधवारी 1996 मध्ये एका वकिलाला अडकवण्यासाठी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. राजस्थानमधील एका वकिलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांनी पालनपूर येथील एका हॉटेलच्या खोलीतून ड्रग्ज जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता, जिथे तो वकील राहत होता. भट्ट त्यावेळी बनासकांठाचे पोलीस अधीक्षक होते.
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी आपल्या निकालात स्पष्ट केले की, भट्टला सलग 20 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. याचा सरळ अर्थ असा आहे की, जामनगर कोठडीतील मृत्यू प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा संपल्यानंतर ही शिक्षा सुरू होईल. भट्ट यांना 2015 मध्ये बडतर्फ करण्यात आले आणि ते 2018 पासून तुरुंगात आहेत. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेएन ठक्कर यांनी बुधवारी भट्ट यांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत दोषी ठरवले आणि गुरुवारी शिक्षा घोषित करण्यात आली. भट्ट यांना दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पैसे न भरल्यास अतिरिक्त वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल.