भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये बुधवारी (13 डिसेंबर) नवीन मुख्यमंत्री मोहन यादव आणि दोन उपमुख्यमंत्री जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. दरम्यान, शपथविधी सोहळ्याच्या काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांचे ट्विटर प्रोफाइल बदलले.
गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशात सत्ता गाजवणारे शिवराज सिंह चौहान आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत. मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) चे प्रोफाइल बदलले. शिवराज यांनी सर्वप्रथम त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवरून ‘मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री’ हटवले आणि ‘मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री’ असे लिहिले. काही तासांनंतर शिवराजने त्यांच्या बायोमध्ये ‘भाऊ आणि ‘मामा’ देखील जोडले.
शिवराज यांनी केले नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
तर, शपथविधी कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांचे अभिनंदन केले. त्यांनी असेही लिहिले की, ‘मला विश्वास आहे की पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत, समृद्ध आणि विकसित मध्य प्रदेश बनवण्याचा संकल्प पूर्ण होईल, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!’