नवी दिल्ली: सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन घटनास्थळी आढळले नाहीत, परंतु ईडीच्या पथकाने बंगल्यातून मोठी रोकड जप्त केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून ३६ लाख रुपयांसह दोन आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत.
दक्षिण दिल्लीतील हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर ईडीने छापा टाकला. सुमारे 13 तास ईडीची टीम बंगल्यात हजर होती. झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. रोख रकमेसोबतच ईडीने बंगल्यातून एक हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि आणखी एक कार आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह जप्त केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेमंत सोरेन यांनी ईडीला सांगितले की, ते बुधवारी त्यांच्या रांची निवासस्थानी भेटणार आहेत.
JMM ची आज महत्वाची बैठक:
झारखंडचा सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने आपल्या सर्व आमदारांना रांची सोडू नये असे सांगितले आहे. याशिवाय, राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी JMMने मंगळवारी रांचीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. त्याचवेळी भाजपने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना फरार घोषित केले असून मुख्यमंत्र्यांबद्दल माहिती देणाऱ्यास 11 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याची इज्जत खराब केल्याचा आरोपही भाजपने केला.
अनेक समन्स बजावूनही हेमंत सोरेन ईडीसमोर हजर नाही:
जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांना अनेकवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मात्र, अनेक वेळा समन्स बजावल्यानंतरही हेमंत सोरेन ईडीसमोर हजर झाले नाहीत. अलीकडेच, ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांची रांची येथील शासकीय निवासस्थानी अनेक तास चौकशी केली होती. यानंतर, ईडीने त्यांना पुन्हा समन्स जारी करून 29 किंवा 30 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. शनिवारी हेमंत सोरेन दिल्लीत आल्याची माहिती समोर आली, त्यानंतर ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची चौकशी करण्यासाठी पोहोचले, मात्र हेमंत सोरेन तेथेही सापडले नाहीत.