पुणे: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आयात केलेल्या वस्तूंवर लादलेले शुल्क रद्द करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांचा वाढता दबाव लक्षात घेऊन ट्रम्प प्रशासनाने हे मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्पच्या शुल्क रद्द करण्याच्या निर्णयानंतर कॉफी, गोमांस आणि फळे यासह 200 हून अधिक अन्न उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द करण्यात आले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

एप्रिलमध्ये ट्रम्प प्रशासनाने अनेक देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क लागू केले होते. दरम्यान, शुल्क वाढल्याने किमती वाढत नाहीत, असा ट्रम्प प्रशासनाचा दावा होता. मात्र, आर्थिक तज्ज्ञांनी याच्या अगदी विरुद्ध निष्कर्ष मांडले आणि देशात महागाई वाढत असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अमेरिकेमध्ये किराणा मालाच्या किमतीत सतत होत असलेली वाढ हा ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीमुळे होत असल्याचे समोर आल्यानंतर अमेरिकेतील ग्राहकांनी संताप व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत नागरिकांची नाराजी दिसून आली ज्यामुळे व्हर्जिनिया आणि न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन उमेदवारांचा दारुण पराभव झाला. जनतेचा वाढता दबाव आणि निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांनी शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे महागाईच्या भडक्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.







