पुणे: कर्जत (Crime New) तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी येथे अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने केवळ अडीच वर्षांच्या मुलाचा गळा आवळून हत्या केली आहे. 9 नोव्हेंबर 2025 रोजी ही धक्कादायक घटना घडली असून मृत चिमुकल्याचे नाव जयदीप गणेश वाघ असे आहे. या घटनेमुळे संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे.

जयदीपचे वडील गणेश वाघ आणि आई पुष्पा मजुरीसाठी बाहेर गेले होते आणि मुले अंगणात खेळत होती. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या जयवंता गुरुनाथ मुकणे (वय 30) हिने जयदीपला उचलून दुसरीकडे नेले आणि त्यांची गळा आवळून हत्या केली.
नैसर्गिक मृत्यूचा बनाव
खुनानंतर आरोपी महिलेने काहीच माहिती नसल्याचे नाटक केले. तिने जयदीप बेशुद्ध झाल्याचे भासवून हा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले. शेजारी खरे सांगत असेल असा आंधळा विश्वास ठेवून कुटुंबीयांनी मुलावर अंत्यसंस्कारही केले होते.
पोलिसांनी केला क्रूर कृत्याचा पर्दाफाश
सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक मृत्यूचा रंग देण्याचा प्रयत्न झाला असला तरी, एका जागरूक नागरिकाने धक्कादायक माहिती दिली. ज्यामुळे संपूर्ण घटना उघडकीस आली, कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. त्या अहवालात जयदीपचा खून केल्याचे स्पष्टपणे नमूद होते. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासणीची चक्रे फिरवली. नेरळ पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत, आरोपी महिला जयवंता मुकणे हिने अखेरीस आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ” माझ्या मुलांना शेजारी राहणारी मुल मारहाण करतात, त्यामुळे मी त्या जयदीपला मारले,” असे तिने सांगितले. विशेष म्हणजे, तिने जयदीपच्या 4 वर्षांच्या बहिणीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न फसला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.







