लोणी काळभोर, ता. 16: किन्नर असल्यामुळे विरोध करते, मला जोगवा मागु देत नाहीस यावरून तृतीयपंथीमध्ये भांडणे झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कदमवस्ती (Kadamwakvasti News) परिसरातील इच्छापुर्ती काळुबाई मंदिराच्या समोर शनिवारी (ता.15) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या भांडणात दोन तृतीयपंथीयांना मारहाण झाली आहे तर 5 जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार उर्फ लल्या (रा. प्रथमा बिल्डींग, रामटेकडी, पुणे) सह अनोळखी ०३ ते ०४ इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोनिका राजेंद्र दोडक (वय ३६, रा. लक्ष्मी नगर पोलीस चौकी समोर, येरवडा, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका दोडक या रिक्षा मध्ये बसुन बहीण स्विटी अंबिका सिंगला भेटण्याकरीता शुक्रवारी (ता.14) रात्री निघाल्या होत्या. मोनिका व स्विटी सिंग हडपसर गाडीतळ येथे भेटले. त्यानंतर दोघी स्विटीच्या कदमवाकवस्ती येथील घरी गेल्या. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बाहेर भांडण झाल्याचा आवाज आल्याने स्विटीने घराच्या बाहेर येवून पाहिले. तेव्हा त्याठिकाणी मोनिका यांच्या ओळखीचा इसम तुषार उर्फ लल्या व त्याच्यासोबत अनोळखी ०३ ते ०४ आले होते.

तुषार उर्फ लल्या हा स्विटीला म्हणाला की, तु माझ्या किन्नर असल्याला विरोध करत आहेस, मला जोगवा मागु देत नाहीस, माझी बदनामी करीत आहे, तु माझ्या वाटेला जावु नकोस, तु माझ्या वाटेमध्ये आलीस तर मी तुला जीवे ठार मारणार अशी धमकी दिली. त्यावेळी मोनिका या तुषार उर्फ लल्याला म्हणाल्या, तु असं का बोलतोय? तेव्हा त्याने मोनिकाला देखील जिवे मारण्याची धमकी दिली. त्याने हातामधील लोखंडी हत्यार अंगावर उगारले. तर त्याच्यासोबतच्या साथीदारांनी स्वीटी व मोनिका यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये मोनिका यांना छातीला, पाठीवर व उजवे हाताला गंभीर दुखापत झाली असुन त्यांची बहीण स्विटी हिला पोटामध्ये, छातीला व पाठीला मारहाण करुन दुखापत झाली आहे.
याप्रकरणी मोनिका यांनी आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार उर्फ लल्या व त्याच्या साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ११५(२), ३५२. ३५१ (२) (३). ३(५), भारतीय हत्यार कायदा ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.
तृतीयपंथीयांची आरोपींना अटक करण्याची मागणी
मोनिका व स्वीटी यांना मारहाण झाल्यानंतर तृतीयपंथीयांनी आरोपी तुषार उर्फ लल्या व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी. यासाठी 30 हून अधिक तृतीयपंथीयांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.१५) ठीया मांडला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एक तपास पथक आरोपींना पकडण्यासाठी रवाना केले. पोलिसांच्या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळून सध्यातरी तृतीयपंथीयांमधील हा वाद मिटविला आहे. पोलीस प्रशासनाकडून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.







