आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे. या तिघींकडून जगातील सर्वांत धोकादायक विष मानलं जाणारं सायनाईड जप्त करण्यात आलं आहे. तसेच या महिलांच्या अटकेनंतर ज्या गोष्टी समोर आल्या, त्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.
या महिलांनी एक मोठा कट रचला आणि खून केल्याची माहिती समोर आली आहे. या तीन महिलांनी आतापर्यंत किमान चार जणांची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी तेनाली जिल्ह्यातून या तीन महिलांना इतर तीन महिलांसह चार जणांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या तिन्ही आरोपी महिला 2022 पासून खून करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलिया आहे.
अनोळखी व्यक्तीशी मैत्री करून तिचा विश्वास जिंकायच्या आणि..
या तिन्ही महिला एखाद्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करून तिचा विश्वास जिंकायच्या, नंतर त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी त्यांना सायनाईड विष मिसळलेले ड्रिंक प्यायला द्यायच्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याआधीही केला गुन्हा..
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सीरियल किलर महिलांनी सर्वांत आधी जून 2022 मध्ये पहिला गुन्हा केला होता. या तिघींनी नुकतीच नागूर बी. नावाच्या महिलेची हत्या केली आणि त्यानंतर आणखी दोन महिलांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्या बचावल्या, असंही पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.तपासा दरम्यान पोलिसांनी रजनी, व्यंकटेश्वरी आणि रामनम्मा या तीन महिलांची ओळख पटवली असून या तिघी तेनाली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
मदियाला व्यंकटेश्वरी ही आरोपी महिला या पूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. मुख्य आरोपी व्यंकटेश्वरी ही यापूर्वी स्वयंसेवक म्हणून काम करत होती. चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी ती परदेशात सुद्धा गेली होती आणि तिथे सायबर गुन्ह्यांमध्ये तिचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
मित्राकडून घ्यायच्या सायनाईड विकत..
या सर्व आरोपी महिला त्यांच्या एका मित्राकडून सायनाईड विकत घेत असत. यांचा मित्र एसी मेकॅनिक आहे. तो सोन्याचे दागिने बनवणाऱ्यांकडून सायनाईड विकत घ्यायचा. पोलिसांनी त्यांच्याकडून सायनाईड आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. तेनाली जिल्ह्यातील घटनेने खळबळ उडाली आहे.