इराण: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणी लष्कराने अमेरिकेला कठोर शब्दांत इशारा दिला असून, अमेरिकन सैनिकांनी इराणच्या भूमीवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

इराणी लष्कराच्या ग्राउंड फोर्सेसचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अली जहाँशाही यांनी सांगितले की, देशाचे सैन्य सीमेवर पूर्णपणे सज्ज आहे. शत्रूच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात असून कोणत्याही संभाव्य कारवाईला सामोरे जाण्यासाठी लष्कर तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या संघर्षातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका जवळ येत असल्याने इराणसोबतचा तणाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर अमेरिकेची भूमिका काही प्रमाणात लवचिक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मात्र, दोन्ही देशांमध्ये सध्या थेट चर्चा सुरू नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्या माहितीनुसार, अमेरिकेसोबतचे संदेश सध्या मध्यस्थ देशांच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. अमेरिकेने पूर्वीच्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे झालेले नुकसान भरून काढल्याशिवाय थेट चर्चेला सुरुवात केली जाणार नसल्याची भूमिका इराणने घेतली आहे.
याचदरम्यान, ओमानसोबत होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही चर्चा सुरू आहे. हा महत्त्वाचा सागरी मार्ग खुला करण्याचा निर्णय अमेरिकेच्या भूमिकेवर अवलंबून राहू शकतो.
इराणने चर्चेसाठी काही कठोर अटी मांडल्या आहेत. त्यात मोठ्या आर्थिक भरपाईसह अमेरिकन सैन्याची माघार आणि सागरी नाकेबंदी हटवण्याच्या मागण्यांचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक मार्ग शोधणे अमेरिकेसाठी आव्हानात्मक ठरत आहे.







