पुणे : महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागाकडून भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमांतर्गत नागरिक आणि मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीतील नावांमधील तार्किक विसंगती दुरुस्त करणे, नवीन नाव नोंदवणे किंवा कोणत्याही प्रकारच्या हरकती नोंदवण्यासाठी आता 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना पुन्हा एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे

ज्या मतदारांना माहितीतील त्रुटीं किंवा ‘नो मॅपिंग’मुळे प्रशासनाकडून नोटिसा मिळाल्या आहेत, त्यांनी तहसील कार्यालय, ईआरओ किंवा एईआरओ कार्यालयांमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व संकलन करतील. याशिवाय मतदार व्हॉट्सॲप किंवा ऑनलाइन प्रणालीद्वारेही आपली कागदपत्रे जमा करू शकतात. प्राप्त कागदपत्रे आणि बीएलओच्या अहवालानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. अत्यंत अपवादात्मक प्रसंगी कागदपत्रे अपूर्ण असल्यास ऑनलाइन सुनावणी घेतली जाईल.

या मोहिमेचा मुख्य उद्देश कोणताही पात्र मतदार नोंदणीविना राहू नये हा आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 3, 4,10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये नवीन नोंदणीसाठी फॉर्म 6 आणि तपशील दुरुस्तीसाठी फॉर्म 8 भरून घेतला जाईल. तसेच महाविद्यालयांमध्ये 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाइन नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. विविध कंपन्या, कारखाने व औद्योगिक संस्थांमध्ये 12 ऑक्टोबरपर्यंत जनजागृती केली जाईल.

नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या ‘Voter Helpline’ ॲपद्वारे किंवा अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या ऑनलाइन नोंदणी व दुरुस्ती करू शकतात. अधिक माहिती व मदतीसाठी 1950 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. नागरिकांनी तहसील कार्यालयात गर्दी न करता बीएलओ अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







