नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे. २७ एप्रिल २०२३ रोजी कर्नाटकात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘तिखट टिप्पणी केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणी दिल्ली न्यायालयाचे न्या. चतिंदर सिंह यांनी सुनावणी करीत म्हटले की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील निवडणूक प्रचार सभेत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. त्यामुळे याचिकाकर्त्यांना प्रचंड राग आला. कारण याचिकाकर्ते हे संघ परिवाराचे सदस्य आहेत. आरोपी व्यक्ती व साक्षीदारांविषयी याचिकाकर्त्याकडे संपूर्ण तपशील आहे. त्यामुळे पोलिसांना कोणतेही पुरावे गोळा करण्याची गरज नाही.
तसेच कोणतेही भौतिक पुरावे जमा करण्याची आवश्यकता नाही. दंड प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १५६ (३) नुसार पोलिसांना तपासाचे आदेश देण्याची गरज नाही, असे न्या. चतिंदर सिंह यांनी स्पष्ट केले. कथित आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यासाठी सीआरपीसीच्या कलम १५६ (३) लागू करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.