नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व नेते आणि पक्ष आपापली समीकरणे जुळवण्यात व्यस्त आहेत. याचाच एक भाग म्हणून 20 मार्च रोजी तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये पप्पू यादव, दानिश अली आणि चौधरी लाल सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. यावेळी पप्पू यादव यांनी त्यांचा ‘जनाधिकार पक्ष’ काँग्रेसमध्ये विलीन केला. त्याचवेळी जम्मू-काश्मीरचे भाजप नेते चौधरी लाल सिंह यांनीही त्यांचा पक्ष ‘डोगरा स्वाभिमान संघटना’ काँग्रेसमध्ये विलीन केला.
सर्वप्रथम पप्पू यादव यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते 5 वेळा खासदार राहिले आहेत. पूर्वेकडील राज्याच्या सीमांचल भागात मजबूत राजकीय पकड असलेले नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांचा मुलगा सार्थक रंजन आणि पक्षाचे इतर नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
यावेळी पप्पू यादव म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाने त्यांचा आदर केला आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी देशातील “हुकूमशाही” विरुद्ध पक्षाच्या लढ्यात सामील होत आहोत. संपूर्ण काँग्रेस परिवाराने दिलेला सन्मान आम्हाला पुरेसा आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनीही आपल्याला खूप आदर दिला आहे. ते म्हणाले की, भारतात जर कोणी लोकांची मने जिंकली असतील, तर ते राहुल गांधी आहेत. लोक त्यांच्यावर प्रेम करतात. हा देश आणि त्याची लोकशाही वाचवण्यासाठी हुकूमशाहाच्या विरोधात राहुल गांधींच्या लढ्यात सामील होण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे पप्पू यादव म्हणाले. 2024 च्या लोकसभा आणि 2025 च्या विधानसभा निवडणुका आम्ही नक्कीच जिंकू, असे ते म्हणाले.
दानिश अली यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
अमरोहाचे लोकसभेचे खासदार दानिश अली यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दानिश अली यांना बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) गेल्या वर्षी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे निलंबित केले होते. दानिश अली यांची काँग्रेससोबतची वाढती जवळीक पक्षाला खटकत होती, त्यामुळे बसपने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर दानिश अली उघडपणे काँग्रेसच्या समर्थनार्थ उभे राहिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही ते सहभागी झाले होते.
चौधरी लाल सिंह यांचा पक्षही विलीन
यासोबतच पीडीपी-भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले पीडीपी-भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले चौधरी लाल सिंह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपला पक्ष ‘डोगरा स्वाभिमान संघटना’ काँग्रेसमध्ये विलीन केला. चौधरी लाल सिंह हे दोन वेळा उधमपूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार राहिले आहेत. चौधरी लाल सिंह यांनी 2004 आणि 2009 मध्ये उधमपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. लाल सिंह 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले आणि नंतर पीडीपी-भाजप सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. मात्र, कठुआ बलात्कार प्रकरणाच्या वादामुळे लाल सिंह यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर लाल सिंह यांनी ‘डोगरा स्वाभिमान संघटना’ हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. उधमपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. जितेंद्र सिंह यांच्या विरोधात काँग्रेस चौधरी लाल सिंह यांना उमेदवारी देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. चौधरी लाल सिंह यांची कठुआ जिल्ह्यात चांगली राजकीय पकड आहे. हा उधमपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.