नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. राजस्थानमधील चुरू येथील खासदार राहुल कासवान यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी राज्यसभेचे खासदार जयराम रमेश, राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, विरोधी पक्षनेते टिकाराम जुली, प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा हेही उपस्थित होते. राहुल कासवान यांना चुरूमधून लोकसभेचे तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
राहुल कासवान यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली, त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. राहुल यांचे वडील रामसिंग कासवान हेही चुरूमधून खासदार राहिले आहेत. राहुल यांची आई कमला देवी आमदार राहिल्या आहेत. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये राहुल कासवान यांचे तिकीट कापून देवेंद्र झाझरिया यांना देण्यात आले. तेव्हापासून राहुल पक्षावर नाराज आहेत. खासदार राहुल कासवान यांचा विवाह उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या भावाच्या मुलीशी झाला आहे.