नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीमध्ये भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांनी विजय मिळवला होता. तर कुस्तीपटू अनिता श्योराण यांचा पराभव झाला होता. आता केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. केंद्र सरकारची ही मोठी कारवाई मानली जात आहे. ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादाला आता विरामचिन्ह लागेल की हे पहावं लागणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाने कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकून अध्यक्षपदावर विराजमान झालेले संजय सिंह आता या पदावर राहू शकणार नाहीत. तसेत नवे अध्यक्ष संजय सिंह यांच्या सर्व निर्णयांनाही स्थगिती दिली आहे. कुस्ती महासंघाची निवडणूक अवैध असल्याचा दावा केंद्र सरकारने कारवाई करताना केला आहे. क्रीडा मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत कुठलीही कारवाई करण्यालाही स्थगिती दिली आहे.
ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय हे अध्यक्ष झाल्याने महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. ब्रिजभूषणसारखाच दुसरा कुणीतरी कुस्ती संघाचा अध्यक्ष बनला आहे, असा आरोप तिने केला होता. तसेच संजय सिंह यांच्या निवडीविरोधात बजरंग पूनिया यानेही पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आपला पद्म पुरस्कार ठेवून एक पत्र लिहिले होते. दरम्यान, कुस्तीपटूंच्या वाढत्या दबावानंतर सरकारने नव्याने सत्तेवर आलेल्या कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे.