Accident News : काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र आणि बाडमेरचे माजी काँग्रेस खासदार मानवेंद्र सिंह यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात राजस्थानच्या अलवर येथे झाला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, माजी खासदार आणि त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सिंह कुटुंबिय दिल्ली-मुंबई महामार्गावरून दिल्लीहून जयपूरला जात असताना अलवर येथे हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर सिंह कुटुंबियांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांच्या पत्नी चित्रा यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवेंद्र सिंह आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून जयपूरला जात होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार भिंतीवर आदळली. अलवरमध्ये दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून माजी खासदार आणि मुलगा जखमी झाले आहेत. मानवेंद्र यांच्या छातीची बरगडी तुटली आहे. तर त्यांचा मुलगा हमीर याच्या हाताला आणि नाकाला फ्रॅक्चर झाले. जखमींना उपचारासाठी अलवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्याठिकाणी अपघात झाला, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नसल्याची माहितीही मिळत आहे. अलवरचे पोलीस उपअधीक्षक तेजपाल सिंह यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पॉईंट ८२.८ याठिकाणी हा अपघात झाला. चालकासह गाडीत चार लोक होते. मानवेंद्र यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.”
कोण आहेत मानवेंद्र सिंग?
माजी खासदार मानवेंद्र सिंग यांचे वडील जसवंत सिंग हे भाजपचे वरिष्ठ नेते होते. जसवंत सिंग हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्रीही होते. त्याचवेळी मानवेंद्र सिंह हे एकेकाळी बारमेरचे खासदार होते, त्यांच्या पत्नी चित्रा सिंह याही राजकारणात सक्रिय होत्या. दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे.