पुणे : कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर भाविकांनी भरलेल्या बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारणिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अग्नितांडवामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हरियाणातील कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेस वेवरील ही घटना आहे. जखमी झालेल्यांना शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 60 भाविक होते. धावत्या बसला आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि दुर्घटनेची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांनाही कळविली.
दरम्यान, या अपघातात बस पुर्णपणे जळून खाक झाली. बसमध्ये ठेवलेले सामान आणि सीट कव्हर जळून खाक झाले होते. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती कळवली आहे.
आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मृत झालेले सर्वजण पंजाब आणि चंदिगडमधील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व मथुरा आणि वृंदावन येथून दर्शन घेऊन घराकडे परतत होते. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, बसमध्ये महिला आणि मुलांसह एकाच कुटुंबातील 60 हून अधिक लोक होते, ते सर्व पंजाबचे रहिवासे होते.