नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. दरम्यान, हिंदी हार्टलँड असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाने उत्साही झालेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा होणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिली यादी जाहीर होऊ शकते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपने उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उमेदवारांना प्रचाराची संधी मिळते, असे पक्षाचे मत आहे. तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळाल्याने याचा फायदा झाल्याचे मानले जात आहे.
भाजप नेत्यांची बैठक :
दिल्लीत शुक्रापासून भाजप पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील संबोधित करणार आहेत . त्यात संघटनेचे राष्ट्रीय अधिकारी, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजपच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण, विस्तार योजना, कॉल सेंटर, मोर्चा उपक्रम यावरही चर्चा होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तीन राज्यांतील बंपर विजयाचा उत्साह पक्षाला कायम ठेवायचा आहे . यासाठी भाजपला राम मंदिराशी संबंधित कार्यक्रमांसह देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करून कार्यकर्त्यांना मैदानात उतरवायचे आहे.