नवी दिल्ली: टीएमसी खासदार महुआ मोईत्रा आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढत आहे. महुआ यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप केल्यानंतर आता निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. महुआ भारतात असताना त्यांचा पार्लियमेंट्री लॉगिन आयडी दुबईत वापरला जात होता, असे भाजप खासदाराने म्हटले आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) ही माहिती तपास यंत्रणांना दिली, असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजप नेत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X वर म्हटले आहे की, दुबईत खासदाराचा आयडी ओपन केला गेला, तेव्हा तथाकथित खासदार भारतात होते. संपूर्ण भारत सरकार, देशाचे पंतप्रधान, वित्त विभाग, केंद्रीय संस्था या एनआयसीवर आहेत. टीएमसी आणि विरोधकांना अजून राजकारण करायचे आहे का? हे जनता ठरवेल. एनआयसीने ही माहिती तपास यंत्रणेला दिली आहे. मात्र, निशिकांत यांनी या पोस्टमध्ये महुआ मोईत्रा यांचे नाव घेतले नाही.
निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर यापूर्वीच आरोप केला आहे की, त्यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतले. महुआ या पैशाच्या बदल्यात जाणूनबुजून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभेची एथिक्स समिती भाजप खासदाराच्या तक्रारीची चौकशी करत आहे. एथिक्स समितीने निशिकांत दुबे यांना २६ ऑक्टोबर रोजी हजर राहून तक्रार देण्यास सांगितले आहे.
त्याचवेळी समितीला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हिरानंदानी यांनी मोईत्रा यांचा संसदीय लॉगिन आयडी वापरल्याचे मान्य केले आहे. याद्वारे त्यांनी अदानी समूहाबाबत प्रश्नही विचारले. दुसरीकडे, टीएमसीने यावर काहीही सांगितलेले नाही. महुआ मोईत्रा यांनीही या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. त्या निशिकांत दुबेवर सतत हल्ला करत आहे. आपल्यावरील आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा:
देवेंद्र फडणवीसांनी विदर्भात जे विकास कामांचे दिवे लावले त्यावर चर्चा होणे गरजेचे: पृथ्वीराज चव्हाण
मोठी बातमी! विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट