पुणे प्राईम न्यूज: बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवरून गुवाहाटीच्या कामाख्या स्टेशनकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला अपघात झाला. या ट्रेनचे 21 डबे रुळावरून घसरले आहेत. बक्सरचे डीएम अंशुल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे 20 जखमींना उपचारासाठी पाटणा एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे 21 डबे रुळावरून घसरले असून त्यात 2 एसी डब्यांचाही समावेश आहे. रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. माहिती मिळताच रेल्वे विभागाचे अधिकारी आणि मदत बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या या घटनेचे कारण समजू शकलेले नाही.
नार्थ ईस्ट एक्सप्रेस के बक्सर जिला में पटरी से उतर जाने की सूचना प्राप्त होते ही जिलाधिकारी व पुलिस अधीक्षक बक्सर, जिला पुलिस बल भोजपुर, SDRF Bihar, जिलाधिकारी भोजपुर घटनास्थल एवं अस्पताल पहुंच कर बचाव व राहत ऑपरेशन शुरू कर चुके है।#TrainAccident pic.twitter.com/iexMf4w8Gq
— Office of Tejashwi Yadav (@TejashwiOffice) October 11, 2023
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या अपघातावर लक्ष ठेवून आहेत. ते सोशल मीडियावर म्हणाले, ‘दिल्लीहून कामाख्याला जाणाऱ्या ट्रेनला बक्सरजवळ अपघात झाला आहे. डीएम आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय मी इतर अधिकाऱ्यांशीही बोललो आहे. अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तैनात करण्यात आले आहेत. लोकांचे प्राण वाचवणे आणि जखमींना उपचार देणे हे आमचे प्राधान्य आहे. हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.
अपघातग्रस्त बोगीतून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती बक्सरचे एसपी मनीष कुमार यांनी दिली आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. इतर डब्यांचाही शोध सुरू आहे.
आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ रात्री 9.35 वाजता रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वेने जारी केली आहे.