दिल्ली: दिल्लीतील लोकसभा सभागृहात महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकांवर जोरदार चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद रंगला.

लोकसभेतील जागा वाढवण्याच्या प्रस्तावावर विरोधकांनी आक्षेप घेतला. यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी असा आरोप केला की, विरोधक एससी-एसटी वर्गाच्या जागा वाढवण्यास विरोध करत आहेत.
या मुद्द्यावरून सभागृहात वातावरण तापले आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार खडाजंगी झाली. चर्चा संपल्यानंतर 131 वी घटनादुरुस्ती, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या तीन महत्त्वाच्या विधेयकांवर मतदान घेण्यात आले.
मात्र, मतदानावेळी सत्ताधारी पक्षाला आवश्यक बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे ही तिन्ही विधेयके नामंजूर झाली. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढे या विषयावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







