नवी दिल्ली: हवाई प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने तिकीट रद्द आणि परताव्याच्या नियमांत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. नव्या नियमांनुसार, तिकीट बुकिंगनंतर 48 तासांच्या आत बदल किंवा रद्द केल्यास एअरलाईन्स अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत.

‘लुक-इन ऑप्शन’ या तरतुदीअंतर्गत प्रवाशांना बुकिंगनंतर दोन दिवसांच्या आत कोणत्याही दंडाशिवाय तिकीट रद्द किंवा बदलण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच, बुकिंगनंतर 24 तासांच्या आत नावातील किरकोळ दुरुस्ती एअरलाईन्सच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.

रिफंड प्रक्रियेबाबतही DGCA ने कडक भूमिका घेतली आहे. तिकीट रद्द केल्यास 14 दिवसांच्या आत परतावा देणे एअरलाईन्ससाठी बंधनकारक असेल. रिफंडला होणारा विलंब आणि त्यासंदर्भातील तक्रारी लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत.

वैद्यकीय कारणांमुळे तिकीट रद्द करण्याच्या बाबतीतही नियम अधिक स्पष्ट करण्यात आले असून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रक्रिया सुलभ केली आहे. विशेष म्हणजे, तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलमार्फत खरेदी केले असले तरी रिफंड देण्याची अंतिम जबाबदारी संबंधित एअरलाईनचीच असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे पर्यटन हंगाम आणि सुट्ट्यांपूर्वी प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. एअरलाईन्सच्या महसुलावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असली, तरी ग्राहकांचा विश्वास आणि निष्ठा वाढविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







