नवी दिल्ली : आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे भूकंपाची. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून यूपीपासून काश्मीरपर्यंत जमीन हादरली असल्याची माहिती मिळत आहे. याचा संबंध हा पाकिस्तानशी असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा पाकिस्तानात आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी नोंवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून ही माहिती देण्यात आली आहे.
बुधवार दुपारी उत्तर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये भूकंपाचे धक्के बसले. त्याचवेळी भारतात सुद्धा दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये जमीन हादरली.
भूकंपाची कारणे?
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. त्यांना टेक्टोनिक प्लेट्स असे म्हणतात. या प्लेट्स आदळतात तेव्हा दाब निर्माण होतो आणि त्यामुळे प्लेट्स तुटू लागतात. यामुळेच भूकंप येतो. भूकंप येताना पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अशा घटना घडतात.
भूकंप आल्यावर काय करायला हवं?
- जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर झाड, वीज खांब, तारापासून दूर राहावं.
- तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये असाल तर मजबूत टेबल, बेड खाली आसरा घ्यावा.
- टेबल नसेल तर आपला चेहरा आणि डोकं हाताने झाकून घ्यावं आणि इमारतीच्या कोपर्यात गुडघ्यावर बसावं.
- इमारतीतून बाहेर पडत असताना लिफ्टचा उपयोग टाळावा, जिन्याचा वापर करावा.