बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये (Bengluru News) एका महिलेने पुट्टेहल्ली पोलिस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध आणि सासरच्या लोकांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तक्रारदार महिलेच्या मते, तिच्या पतीने आणि सासरकडील मंडळींनी लग्नानंतर दहेज, ब्लॅकमेल आणि शारीरिक-मानसिक छळ केला.

तक्रारीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये सय्यद इनामुल हकशी तिचा विवाह झाला. या वेळी 340 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि यामाहा बाईक देण्यात आली होती. लग्नाच्या काही दिवसांतच महिलेच्या लक्षात आले की तिचा पती आधीच विवाहित आहे. त्याने तिला थेट सांगितले की ती त्याची दुसरी पत्नी आहे, इतकेच नव्हे तर त्याचे इतर 19 महिलांशीही संबंध आहेत, असा धक्कादायक दावा त्याने केला होता.

तक्रारदार महिलेने पुढे सांगितले की, तिच्या पतीने त्यांच्या बेडरूममध्ये गुप्तपणे कॅमेरा लावून खासगी क्षण रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ त्याने परदेशातील आपल्या सहकाऱ्यांशी शेअर केले. एवढ्यावरच थांबता न राहता, त्याने भारताबाहेर राहणाऱ्या आपल्या मित्राशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला दबाव टाकला. विरोध केल्यास तिचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

महिलेने आपल्या सासरकडील लोकांवरही गंभीर आरोप केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलमध्ये आणि अगदी पालकांच्या घरीसुद्धा पतीने वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फ्लॅट खरेदी करण्यासाठी तिचे सोन्याचे दागिने विकण्याचा दबाव टाकला. नकार दिल्यावर तिच्यावर मारहाण केल्याचे ती म्हणते. फेब्रुवारीतील एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान नणंदेकडून अपमान, तसेच दीराने अनुचित वर्तन केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
21 सप्टेंबर रोजी झालेल्या एका वादाच्या वेळी आरोपी पतीने तिच्यावर हल्ला करून नंतर घरातून पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात पती आणि इतर आरोपी कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सय्यद इनामुल हक सध्या फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.







