लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 948 मध्ये 1 हेक्टर 47 गुंठे आमच्या मालकीची शेतजमीन आहे. थेऊर ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही परवानगी न घेता शेतजमिनीत अतिक्रमण करून रस्त्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी. असा आरोप जेष्ठ महिलेने करून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

सुमन शंकर कुंजीर (वय-75, रा. थेऊर, ता. हवेली) असे तक्रार करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव आहे. कुंजीर या जाधववस्ती परिसरात असलेल्या शेतात कुटुंबासोबत राहतात. या तक्रार अर्जात कुंजीर यांनी असे म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे शेतात जेसीबी लावून जागा साफ करून घेतली आहे. शेतात मार्किंग करून खडी मुरूम टाकला आहे. तसेच त्याच्यावर रोलिंगसुद्धा करून घेतली आहे. हे चाललेले अनधिकृत काम थांबविण्यासाठी पुतण्या व नातू गेला होता. त्यावेळी तेथील लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, एका व्यक्तीने देखील आमच्या जागेचा फायदा घेतला आहे. त्याने आमच्या शेतजमिनीत लोखंडी सामान ठेवले आहे. तसेच शेणाचा उकिरडा व गटार करून अतिक्रमण केले आहे. त्याने देखील आम्हाला धमकी दिली आहे. त्यामुळे आम्हाला आमची जागा असून देखील शेती करणे अवघड झाले आहे. अनधिकृत कामे थांबवावी. व आम्हाला आमच्या जागेच्या सभोवती भिंत बांधायची आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळावे. व दोषींवर योग्य कारवाई करावी. अशी मागणी सुमन कुंजीर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

थेऊर येथील गट क्रमांक 948 मधील रस्ता हा खूप जुना आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात या रस्त्याने येणे जाणे आहे. त्या गटामध्ये खडी व मुरुमीकरण करण्यात आले आहे. परंतु, या रस्त्याच्या संदर्भात एका महिलेने ग्रामपंचायत कार्यालयाला काम थांबविण्यासाठी अर्ज दिला आहे. मात्र त्या अर्जाला कोणतीही कागदपत्रे अथवा क प्रत जोडलेली नाही. त्यामुळे हद्द निश्चित करता येत नाही. संबंधित महिलने कागदपत्रे कार्यालयात लवकर जमा करावे. म्हणजे आम्हाला योग्य तो निर्णय घेता येईल.
टी एस पाटील (ग्रामसेवक, थेऊर, ता. हवेली)







