नवी दिल्ली : लोकसभेमध्ये आज मोठी घोषणा करण्यात आली. जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर सर्वांची सहमती आहे. त्यामुळे आता जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे पाक व्याप्त कश्मीरसह जम्मू-कश्मीर विधानसभेची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे.
2 नॉमिनेटेड सदस्य आणि अनधिकृत पाकिस्तानच्या भागातील 1 नॉमिनेटेड सदस्याची निवड केली जाईल. त्यामुळे अगोदर विधानसभेत सर्व मिळून 3 नॉमिनेटेड सदस्य होते. आता 5 नॉमिनेटेड सदस्य असणार आहेत. त्याचबरोबर या बदलांमुळे जम्मू भागातील विधानसभेच्या जागा 37 वरून 43 वर जाणार आहेत. शाह म्हणाले की, हे विधेयक कश्मीरी पंडितांना न्याय देणारं विधेयक आहे. ज्यांच्यावर गेल्या 70 वर्षांपासून अन्याय झाला आहे. ज्यांना दुर्लक्षित करण्यात आलं आहे. त्यांना या विधेयकाच्या माध्यामातून न्याय मिळणार आहे. त्या लोकांचा यामुळे विकास होणार आहे. कश्मीरी पंडितांना त्यांच्याच देशात विस्थापित म्हणून जगावं लागंल आहे. त्यामुळे त्यांना आता जम्मू-कश्मीर विधानसभेत आरक्षण मिळणार आहे.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, मला आनंद आहे की, या विधेयकाला विरोध झाला नाही. सहा तास चर्चा चालली. पण ज्यांच्यावर दहशतवाद संपवण्याची जबाबदारी होती. ते इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. जे विचारत होते कश्मीरी पंडितांना आरक्षण दिल्याने काय होणार? मी त्यांना सांगेन की, त्यामुळे कश्मीरी पंडितांचा आवाज कश्मीर विधानसभेत पोहचणार आहे. तसेच विस्थापन देखील थांबेल.