Andhra Pradesh Train Accident : (नवी दिल्ली) : आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. हा अपघात कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्थानकादरम्यान झाला.
अपघातग्रस्तांना 10 लाख रुपयांची मदत
सिग्नल तोडल्याने अपघात : रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेनने पुढच्या ट्रेनला मागून धडक दिली. समोर असलेली ट्रेन संथ गतीने धावत होती. त्याचवेळी या ट्रेनने तिला मागून धडक दिली,’ असे रेल्वे मंत्रालयातून सांगण्यात येत आहे.
15 लाखांची मदत जाहीर : अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत सरकारकडून केली जाईल. तर जखमींना 5 लाख रुपयांची मदत केली जाईल. असे पीएमओ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून दिली जाईल. तर 50 हजार रुपयांची मदत जखमींच्या कुटुंबातील नातेवाईकांना केली जाईल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या अपघातानंतर खेद व्यक्त केला. अधिकाऱ्यांना जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
मोदींकडून परिस्थितीचा आढावा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातग्रस्त सर्व लोकांना मदत करण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. पंतप्रधान मोदींनी शोक, सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली,” असे ट्विट करण्यात आले आहे.
वेळापत्रक कोलमडले : या अपघातानंतर चेन्नई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक कोलमडलं आहे. या मार्गावरील अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत अनेक ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला आहे. पूर्व रेल्वेच्या या अपघातानंतर रेल्वेकडून एक पत्रक जारी करण्यात आला आहे. दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेष ट्रेन्ससहीत मदतीसाठीची उपकरणे घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.