उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलाबाबत केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षाच्या भविष्याबाबत एक वादग्रस्त भाष्य केले आहे. राजभर यांच्या दाव्यानुसार, आगामी काळात समाजवादी पक्षाला मोठी गळती लागण्याची शक्यता असून, यातील बडे चेहरे भाजपमध्ये विलीन होऊ शकतात. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांत पक्षांतराचे जे राजकारण पाहायला मिळाले, त्याचीच पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात होण्याची शक्यता राजभर यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, तृणमुल, आप तसेच ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता समाजवादी पक्ष फुटणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच राजभर यांनी समाजवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले आहे. खाण घोटाळा आणि गोमती रिव्हर फ्रंट प्रकल्पाच्या चौकशीमुळे समाजवादी पक्षाचे अनेक नेते दहशतीखाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाने राजभर यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. राजभर यांची विधाने म्हणजे केवळ निरर्थक बडबड असल्याचेही समाजवादी पक्षाने स्पष्ट केले.








