पुणे प्राईम न्यूज: अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने एनडीएपासून फारकत घेतली आहे. पवन कल्याण यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला पाठिंबा दिला आहे. पवन कल्याण यांनी नुकतीच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षासोबत युती केली होती. त्यांच्या अटकेचा निषेधही त्यांनी केला होता. तेव्हापासून ते भाजपपासून वेगळे होऊ शकतात, असे मानले जात होते.
2020 मध्ये भाजपशी हातमिळवणी
पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने जानेवारी २०२० मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्थानिक निवडणुका, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान 2023 मध्ये जनसेना पक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या जवळ जाऊ लागला. अलीकडेच पवन कल्याण यांनीही टीडीपीसोबत युतीची घोषणा केली. टीडीपी एनडीएच्या युतीमध्ये नाही, त्यामुळे जनसेना पक्ष एनडीएपासून वेगळा होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु, पवन कल्याणा यांनी भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवला होता. आता अचानक त्यांनी एनडीएपासून दुरावले. ते उघडपणे टीडीपी आणि चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा देत आहेत.
तेलंगणातही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू
दोन दिवसांपूर्वी पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचने आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत 119 जागांपैकी 32 जागा लढवण्याची घोषणा केली होती. पक्ष ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका हद्द आणि खम्मम जिल्ह्यातील बहुतांश जागा लढवणार आहे. खुद्द पवन कल्याण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याला दुजोरा दिला.