नवी दिल्ली: देशात जटील व संवेदनशील बनलेल्या इच्छामरणाच्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा नुकताच जारी केला आहे. गंभीर आजारपणाचा सामना करणाऱ्या एखाद्या रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली (लाइफ सपोर्ट सिस्टीम) हटवण्याबाबत काही अटींच्या आधारे काळजीपूर्वक विचार करून डॉक्टरांनी निर्णय घेतला पाहिजे. यात रुग्ण किंवा त्याच्या आप्तेष्ठांकडून लिखित स्वरूपात दिलेला नकारसुद्धा महत्त्वाचा आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. यामुळे गंभीर व दुर्धर आजारांमुळे वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळलेल्या व मरणासन्न अवस्थेतील देशातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये होणारा संघर्षही टळणार आहे. इच्छामृत्यूच्या मसुद्यावर येत्या २० ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इच्छामरणाच्या दिशानिर्देशात ‘पॅसिव यूथेसिया’ अर्थात ‘जीवनरक्षक उपाय बंद करून रुग्णावर मृत्यू ओढावू देण्यासाठी’ चार महत्त्वाच्या अटी ठरवल्या आहेत. यात प्रामुख्याने रुग्णाचे सर्वोत्तम हित विचारात घेऊन निर्णय घेतला जाऊ शकतो, जेणेकरून एखाद्या असाध्य रोग जडलेल्या स्थितीत रुग्णाची ‘जीवनरक्षक प्रणाली’ काढून घेता येईल. ज्याचा रुग्णाला कोणताही फायदा होण्याची शक्यता नसेल किंवा त्याला त्रास होणार नाही व त्याच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचण्याची शक्यता नसेल, याचा चार अटींमध्ये समावेश आहे. रुग्णाला ब्रेनस्टेम (मस्तिष्काचा एक भाग) डेड घोषित करण्यात आले आहे. डॉक्टरांनी रुग्णाच्या स्थितीची पूर्ण तपासणी केली असेल आणि रुग्णाचा रोग प्रगत अवस्थेत पोहोचला आहे आणि त्याच्यावर केलेल्या कोणत्याही उपचारांचा फायदा होणार नाही, हे स्पष्ट केले असेल.
कुटुंबाने ‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’ सुरू ठेवण्यास लिखित स्वरूपात नकार दिला असेल. लाइफ सपोर्ट हटवण्याची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांनुसारच केली जावी. अशा प्रकारच्या या चार अटी आरोग्य मंत्रालयाने इच्छामरणाच्या प्रकरणात घालून दिल्या आहेत. असाध्य आजार जडलेल्या रुग्णावर व्हेंटिलेटरच्या मदतीने उपचार करायचा की नाही? याबाबत डॉक्टरांनी काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतला पाहिजे. इच्छामरणाबाबत निर्णय घेताना नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे डॉक्टरांना कायदेशीर तपासणीच्या कक्षेत आणून त्यांच्यावरील ताण कमी करता येईल, असे मत भारतीय वैद्यकीय असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी व्यक्त केले. उपचारसंबंधित निर्णय डॉक्टर सद्भावनेने घेतात. अशा प्रत्येक प्रकरणात रुग्णाच्या कुटुंबीयांना परिस्थिती समजावून सांगितली जाते आणि संपूर्ण माहिती दिली जाते. प्रत्येक बाबींचा बारकाईने विचार करूनच निर्णय घेतला जातो. विज्ञान आणि परिस्थितीनुसार काही गोष्टी कुटुंब, रुग्ण आणि डॉक्टरांवर सोडल्या पाहिजेत, असेही अशोकन यांनी नमूद केले.