केरळ : केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या सावत्र पित्याला न्यायालयाकडून १४१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील मांजेरी शहरातील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अश्रफ एएम यांनी आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण (पोक्सो) कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायदा यातील विविध तरतुदींनुसार एकूण १४१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाच्या २९ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, दोषीला एकूण ४० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण की ही त्याला सुनावण्यात आलेली सर्वोच्च शिक्षा आहे. यामध्ये म्हटलं आहे की, वेगवेगळ्या तरतुदींनुसार दिलेल्या वेगवेगळ्या शिक्षा एकत्र चालतील. न्यायालयाने दोषीला 7.85 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे तसेच पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार आणि पीडिता हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. दोषी व्यक्ती या मुलीचा सावत्र पिता असून पीडितेचे 2017 पासून लैंगिक शोषण करत होता. एका मित्राच्या सांगण्यावरून पीडितेने अखेर पोलिसात तक्रार करणाऱ्या तिच्या आईला संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर सर्व प्रकरण उघडकीस आले.