नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. याशिवाय त्यांनी मध्य प्रदेशातही मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. तर तेलंगणात काँग्रेसने सत्ताधारी बीआरएसचा पराभव केला. या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षही ताकदीने रिंगणात उतरला, मात्र त्यांना सर्वत्र पराभवाला सामोरे जावे लागले.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही. छत्तीसगडमध्ये आम आदमी पक्षाला 0.94 टक्के मतांवर समाधान मानावे लागले. मध्य प्रदेशात त्यांना केवळ 0.43 टक्के आणि राजस्थानमध्ये 0.38 टक्के मते मिळाली. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने राजस्थानमधील 88 जागांवर, छत्तीसगडमध्ये 57 जागांवर आणि मध्य प्रदेशातील 70 हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते.
दुपारी 3.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 53, काँग्रेस 35 आणि बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. येथे सरकार स्थापनेसाठी 46 जागांची आवश्यकता आहे. मध्य प्रदेशात भाजप 166, काँग्रेस 62 आणि बसपा एका जागेवर आघाडीवर आहे.
तर राजस्थानमध्ये भाजपला 115, काँग्रेसला 69 आणि इतरांना 7 जागा मिळतील. तिन्ही राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. तेलंगणात काँग्रेस पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार आहे. येथे काँग्रेसच्या खात्यात 64, तर बीआरएसच्या खात्यात 40 जागा जातील. भाजप 8 जागांवर तर एआयएमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे.