पुणे प्राईम न्यूज: दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी सकाळी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला. दारू गैरव्यवहार प्रकरणात हा छापा टाकला गेला. दुपारनंतर ईडीने संजय सिंग यांना अटक केली. सुमारे 10 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. याआधीही याच प्रकरणात सिंग यांच्या निकटवर्तीयांची झडती घेण्यात आली होती. संजय सिंग यांच्या अटकेचे वृत्त समोर आल्यानंतर आम आदमी पक्षात खळबळ उडाली आहे.
ईडीच्या आरोपपत्रानुसार दिल्ली दारू धोरण गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले व्यावसायिक दिनेश आरोडा यांनी संजय सिंह यांच्या उपस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ते दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याही संपर्कात आले.
दिल्ली निवडणुकीपूर्वी निधी गोळा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वर्षी मे महिन्यात ईडीने सिंग यांच्या निकटवर्तीयांच्या परिसराची झडती घेतली होती. तसेच दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाच्या संदर्भात ईडीने त्यांचे दोन सहकारी अजित त्यागी आणि सर्वेश मिश्रा यांच्या घरांवर छापे टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सीएम केजरीवाल यांचा भाजपवर वार
दारू धोरण प्रकरणी ईडीच्या कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांच्या घरी काहीही सापडणार नाही. ते म्हणाले की, 2024 मध्ये निवडणुका येत आहेत. त्यांना माहित आहे की ते हरतील. हे त्यांचे हतबल प्रयत्न आहेत. निवडणुका जसजशा जवळ येतील, तेव्हा ईडी, सीबीआयसारख्या सर्व एजन्सी कार्यरत होतील.