नवी दिल्ली : जोडप्यामधील सहमतीपूर्ण नातेसंबंध तुटल्याने पुरुषावर बलात्काराचा खटला चालवता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने एका व्यक्तीविरुद्धचा बलात्काराचा खटला रद्द करताना हा निर्णय दिला. दीर्घकालीन नात्यामध्ये असलेले शारीरिक संबंध हे मुलीची संमती दर्शवतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि एन. कोतिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
जोडप्यामधील सहमतीचे नाते तुटल्याने एखाद्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू होऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. मुलीने तिच्या संमतीशिवाय आरोपीसोबत दीर्घकाळ संबंध ठेवणे अकल्पनीय आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, फक्त जोडप्यांमधील सहमतीपूर्ण नातेसंबंध तुटल्याने फौजदारी कारवाई सुरू करता येणार नाही.
नातेसंबंधाचा परिणाम वैवाहिक जीवनात होत नाही, म्हणून बलात्काराचा खटला चालवता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दिल्लीतील पुरुषाविरुद्ध खटला फेटाळताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात फिर्यादीने २०१९ मध्ये एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीत आरोप केले आहेत की, आरोपीने लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, आरोपीने तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.