Ram Mandir : २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येच आत्तापासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी योगी सरकारने ठोस व्यवस्था केली आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आणि त्यानंतर येणारी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन योगी सरकारने अयोध्या धाममध्ये पार्किंगसाठी ५१ ठिकाणे निश्चित केली आहेत.
या पार्किंगमध्ये २२,८२५ वाहने उभी करता येणार आहेत. एवढंच नाही तर पार्किंगसाठी कोणालाही भटकावे लागू नये म्हणून गुगल मॅपवर पार्किंग स्पॉट्स अपलोड करण्यात आले आहेत. व्हीव्हीआयपी, व्हीआयपी आणि इतर पाहुण्यांसाठीही पार्किंगची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. या पार्किंग लॉटमध्ये वायरलेस आणि पीए यंत्रणा बसवण्यात आली आहे.
या ठिकाणी असेल पार्किंगची व्यवस्था
एडीजी ट्रॅफिक बीडी पॉलसन यांनी सांगितले की, अयोध्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने पार्क करण्यासाठी ५१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये एकाच वेळी २२,८२५ वाहने पार्क करता येतील.
- रामपथवर ५ ठिकाणे
- भक्तीपथ मार्गावर १ जागा
- धर्मपथ मार्गावर ४ ठिकाणे
- परिक्रमा मार्गावर ५ ठिकाणे
- बंधा मार्गावर २ ठिकाणे
- अयोध्या ते गोंडा मार्गावर २ ठिकाणी
- NH २७ वर १० ठिकाणी
- तीर्थ क्षेत्र पुरम येथे ७ ठिकाणी
- कारसेवक पुरम टेंट सिटीच्या आसपास ३ ठिकाणी
- रामकथा मंडपम टेंट सिटीमध्ये ४ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
शासकीय, नझूल, खासगी आणि पर्यटन विभागाच्या जमिनींवर हे पार्किंग उभारण्यात आले आहेत. याशिवाय अयोध्येमध्ये बनवण्यात आलेल्या मल्टीलेव्हल पार्किंगमध्येही वाहने उभी केली जाणार आहेत.