राजौरी: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील बाजी माल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, यात दोन लष्करी अधिकारी आणि एक जवान शहीद झाले आहेत. तर अन्य जखमी जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उधमपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मूचे आयजी आनंद जैन यांनी सांगितले की, राजौरीतील कालाकोट भागातील धरमसाल पोलिस स्टेशनच्या सोल्की गावातील बाजी माल परिसरात किमान दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीवरून या भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम राबवण्यात आली.
या चकमकीत दोन कॅप्टन आणि एक जवान शहीद झाल्याने गावात शोककळा पसरली असून जंगलाच्या त्या भागाला लष्कराने चारही बाजूंनी वेढा घातला आहे; जिथून गोळीबार होत आहे. जैश आणि पीएएफएफचे काही वेगळे गट आहेत, ज्यांना बाजीमल क्षेत्राजवळील गुलाबगढ जंगलात घेरण्यात आले आहे. हा एक जुना गट आहे, जो सुरुवातीला 5 ऑक्टोबर रोजी देखील दिसला होता. त्यानंतर सुरुवातीच्या गोळीबार झाला होता, तेव्हापासून हे ऑपरेशन सुरु आहे. घटनास्थळी लष्कर आणि पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.
काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी या परिसराला वेढा घातला आहे. हे वनक्षेत्र असल्याने दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. मात्र, त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी इतर पद्धतींचाही अवलंब करण्यात आला आहे.
दरम्यान दोन ते तीन दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, ते एका स्थानिक रहिवाशाच्या घरी जेवण करण्यासाठी आले होते. गेल्या 4 दिवसांपासून लष्कर आणि पोलीस या परिसरात तपासात व्यस्त होते. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी मंगळवारी घेराव घालत शोध मोहीम सुरू केली. बुधवारी सकाळपासून येथे चकमक सुरू आहे.