मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालवला जातो, त्याच मंत्रालयात आतल्या भागात जाळीवर उड्या मारून आंदोलन करण्याच्या घटना आजपर्यंत घडल्या आहेत. पण, आज (दि. २४० मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या झाडावर चढून एका तरुणाने अनोखे आंदोलन केले आहे. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना या तरुणाला खाली उतरवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मंत्रालयासमोर असलेल्या एका झाडावर एक तरुण चढला होता. या तरुणाने एक बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुमित सोनवणे असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. झाडावर चढल्यानंतर या तरुणाने जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी झाडाकडे धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाची गाडीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर सदर तरुणाला खाली उतरवण्यात आले आहे. गावातील ग्रामपंचायतीत झालेल्या घोटाळ्याबद्दल कारवाई करावी, अशा आशयाचे बॅनर या तरुणाने फडकावले होते. तरुणाला आता आझाद नगर पोलीस स्टेशनला नेण्यात आले असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.







