नवी मुंबई : उरणमधील 20 वर्षीय तरुणी यशश्री शिंदेच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेतील आरोपी दाऊद शेखला आज नवी मुंबईच्या गुन्हे विभागाने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे. घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहे. यशश्री पुढे चालत असताना दाऊद तिचा पाठलाग करत असल्याचे त्यात दिसून येते. तर या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे.
यशश्री शिंदे हिची हत्या केल्याची कबुली दाऊद शेख याने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आम्ही कर्नाटकमधून दाऊद शेखला ताब्यात घेतले तेव्हा त्याची चौकशी केली. त्यावेळी दाऊदने हत्या केल्याची कबुली दिली. यशश्री शिंदे आणि दाऊद शेख यांची पूर्वी ओळख होती. मध्यंतरी तीन-चार वर्षे ते संपर्कात नव्हते. त्यामुळेच दाऊदने तिची हत्या केली असावी. आमची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. इतक्यात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
यशश्री शिंदे हिचा मृतदेह उरणमधील एका झुडपात आढळून आला होता. तिच्या पोटावर, गुप्तांगावर अनेक वार होते. तसेच तिच्या चेहऱ्यासह शरीराचे लचके तोडण्यात आले होते. याविषयी बोलताना पोलिसांनी सांगितले की, यशश्रीच्या शरीरावर ज्या जखमा आहेत, त्या जीवघेण्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरील जखमा कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे झाल्या असाव्यात, अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.
सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकमधून पोलिसांनी अजून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दाऊद हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दाऊद आणि त्याच्यामध्ये काय संवाद झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.