मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात आली होती. महिलेने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करत ही महिला तिथून निघून गेली. सदर घटनेचा व्हिडीओ समोर येताच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता संबंधित महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
मात्र, संबंधित घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी ठळकपणे समोर आल्या आहेत. गुरुवारी रात्री ही महिला मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नसल्याने महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्याठिकाणी तोडफोड केली.