मुंबई: राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी नवीन कायदा पारित केला जाणार आहे. परंतु, सरकारने विधानसभेत हा कायदा मंजूर करताच पुढच्या काही तासांमध्ये आपण या कायद्याला कोर्टात आव्हान देणार, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. “आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा उद्याचा एक दिवस असेल. मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घातला जात आहे. कायदा तयार करण्याची संहिता आपण विसरलोत का? मराठा आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण होईल. 50 टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देत आहेत, इतरांसाठी केवळ 37 टक्के शिल्लक राहणार आहे. खुल्या प्रवर्गात गुणवंत राहणे गुन्हा आहे का? उद्या राजच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. खुल्या प्रवर्गातील लोक देखील मतदार आहेत. तसेच ओबीसींच्या बाबतीत कुणबीकरण केले जाऊ शकत नाही, सगेसोयरे कायदा करता येणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी मांडली.
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज्य सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला तयार राहा. कायदा आला तर न्यायालयात जयश्री पाटील-2 नावाची केस दाखल होईल. मंगळवारी सरकारने कायदा आणला तर काही तासांमध्ये न्यायालयात कायद्याला चॅलेंज करणार”, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.