मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रविवार, ३१ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त झाले. शनिवार, रविवारची शासकीय सुट्टी लक्षात घेता सेठ यांना शुक्रवारीच २९ डिसेंबरला राज्य पोलीस दलाच्या वतीने निरोप देण्यात आला.
मुंबईतील नायगाव येथील पोलीस मैदानावर त्यांना मानवंदना देण्यात आली. राज्य सरकारने सेठ यांची यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली आहे. सेठ यांच्यानंतर पोलीस महासंचालकपदासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांची नावे चर्चेत होती.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील पोलीस अधिकारी असलेल्या शुक्ला यांची सेवाज्येष्ठतेनुसार डीजीपीपदी वर्णी लागेल, असं सांगितलं जात होतं. मात्र, शुक्ला यांनीच राज्याचे पोलीस प्रमुखपद घेण्यास नकार दिल्याने राज्य सरकारने तातडीने मुंबई सीपी फणसाळकर यांच्याकडे डीजीपीपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.
रजनीश सेठ यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्राचे DGP म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) महासंचालक म्हणून काम केलं होतं. त्यापूर्वी त्यांनी मुंबई शहरात सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणूनही काम केलं आहे.