मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अगदी काही तास बाकी असताना विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यामुळे सध्या भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या आरोपांवर विनोद तावडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले, ” मी निवडणुकीसंदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी बविआचे कार्यकर्ते तिथे आले, त्यांचा असा गैरसमज झाला की, मी पैसे वाटतो आहे. पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे. मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. त्यात खरं खोटं नक्कीच बाहेर येईल, असे तावडे म्हणाले.
नेमंक प्रकरण काय ?
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट रोखून धरली आहे. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.