मुंबई: ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर झाल्याचा दावा केलेल्या छळाची माहिती दिली. लग्नानंतर सात वर्षे मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला.

गिरीजा राऊत म्हणाल्या, “विनायक राऊत कधीच आमच्यासोबत राहत नव्हते. आम्ही मुंबईतील चाळीत राहत होतो, तर ते दुसऱ्या घरात राहत होते. त्यांनी दुसरे लग्न आणि दुसरे घर असल्याची बाब माझ्यापासून लपवली होती. ते फक्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि दसऱ्याला घरी यायचे. त्याव्यतिरिक्त ते फोनवरूनच घरातील जबाबदाऱ्यांबाबत सूचना द्यायचे.”

पत्रकार परिषदेत गिरीजा राऊत यांनी आरोप केला की, “माझ्या वागण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर निर्बंध घालण्यात आले होते. मला माझ्या सासूप्रमाणेच वागण्यास भाग पाडले जात होते. माझे केस ओढून मला मारहाण केली जायची. माझ्यावर सातत्याने मानसिक दबाव टाकला गेला.”

त्यांनी पुढे दावा केला, “माझे पती गितेश राऊत हे घरात आणि बाहेर पूर्णपणे वेगळे वागत. घरात ते मला आणि माझ्या आईलाही अश्लील शिवीगाळ करायचे. बाहेर त्यांच्या वागण्यावरून कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही.”
गिरीजा राऊत यांनी आरोप केला की, सासरच्या मंडळींकडून त्यांना बळजबरीने गोमूत्र पाजण्यात आले. तसेच त्यांच्या डोक्यावरील केस कापण्यात आले आणि विविध कथित बाबा व मांत्रिकांकडून अघोरी विधी करण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे आपण प्रचंड मानसिक त्रास सहन केल्याचा दावा त्यांनी केला.
तक्रार उशिरा का केली, यावर उत्तर देताना गिरीजा राऊत म्हणाल्या, “विनायक राऊत यांचा राजकीय प्रभाव मोठा असल्यामुळे मी आधी तक्रार करण्याचे धाडस करू शकले नाही. परिस्थिती कधीतरी सुधारेल, या आशेवर मी सात वर्षे सर्व काही सहन केले.”
दरम्यान, या प्रकरणात गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि इतर कुटुंबीयांसह काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपांचा तपास पोलीस करत असून, संबंधित आरोपांवर विनायक राऊत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.







