पालघर: पालघर (Vasai News) जिल्ह्यातील वसई येथील कळंब परिसरात एका हॉटेलमध्ये ३३ वर्षांच्या विवाहित तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विकी परदेशी असे या तरुणाचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी होता. तो आपल्या विरार येथील प्रेयसीसोबत फिरण्यासाठी कळंबच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या लॉजवर गेला होता. तिथे असतानाच अचानक त्याची तब्येत खालावली आणि त्यातच त्याचा जीव गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार ३० डिसेंबर २०२५ रोजी विकी आणि त्याची मैत्रीण लॉजच्या खोलीत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. तो धूम्रपान करत असतानाच त्याच्या छातीत जोरात कळा येऊ लागल्या. त्याची गंभीर अवस्था पाहून घाबरलेल्या मैत्रिणीने तत्काळ हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलावले. त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
अर्नाळा सागरी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. विकीला एनर्जी ड्रिंक पिण्याचे आणि अति प्रमाणात धूम्रपानाचे व्यसन होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. यामुळेच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.







