लोणी काळभोर, ता. 31: खुलेआम सुरु असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दोघांना अटक करून 2 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा लॉज जवळील मोकळ्या मैदानात सोमवारी (ता.19) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केली आहे.

पांडुरंग संभाजी काळभोर (वय- 55, पोस्ट ऑफीसजवळ, कदमवाकवस्ती. ता हवेली, जि. पुणे) व शंकर आप्पा शिंदे (वय 64, रा. खोकलाई देवी मंदिराजवळ, लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत प्रकाश सुतार यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग काळभोर व शंकर शिंदे हे दोघेजण आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे कल्याण मटका हा जुगार पैशांवर घेत असताना मिळून आले. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.
हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा
इंदिरानगर झोपडपट्टीत गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी (ता.30) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. इंदू दादा खलसे (वय-30, इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे दारू विक्री करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विजय जाधव करत आहेत.






