मुंबई : नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघे आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र बांधतात अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली. लोकसभा निवडणुकांसाठी काही दिवसांच असताना कोकणात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. त्यासोबतच उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला. नारायण राणेंना शिवसेनेने मुख्यमंत्री केलं. म्हणून आज ते मोठ्या गाड्यातून फिरू लागले असल्याचे नाईक यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आमची निष्ठा असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही त्यांनी म्हटले.
नितेश राणे काय म्हटले?
रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपने दावा केला आहे. या जागेवरून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. नितेश राणे यांनी म्हटले की, 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. ती जागा शिंदे गट लढवणार आहे. मात्र, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर कोणाचाही दावा नाही. ज्याची ताकत जास्त आहे. त्यालाच ती जागा मिळेल असे राणे यांनी म्हटले. या मतदारसंघात भाजपची 7 लाख मते असल्याचे त्यांनी म्हटले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आले आहे. तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रविंद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील आहेत. कोकणतील जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे आल्यास अगदी जुने – जाणते कार्यकर्ते देखील एकदिलानं काम करतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.