मुंबई: शहराच्या नागपाडा परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे पाण्याची टाकी साफ करताना चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आणि एक कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हसीबुल शेख, राजा शेख, जलालू शेख, इमानदू शेख अशी मयत कामगारांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व बीएमसी वॉर्डचे कर्मचारी तसेच रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहचली आहे.
घटना घडल्यानंतर लागलीच या कामगारांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संबंधित डॉक्टरांकडून गुदमरलेल्या 4 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तर एक कामगार गंभीर असल्याचे सांगितले जातंय. मात्र अचानक घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या नागपाडा परिसरात असलेल्या बिस्मिल्ला स्पेस या इमारतीचे काम सूरु आहे. या इमारतीच्या तळघरात पाण्याची टाकी आहे. त्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर पुरहन शेख हा कामगार गंभीर आहे. टाकीत असलेले खांब काढायला व टाकी साफ करायला ही कामगार गेले होते. मात्र तेथेच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच जणांना बाहेर काढले आणि तत्काळ जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याप्रकरणाची चौकशी करून जे.जे मार्ग पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. अशी माहिती जे.जे मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे यांनी दिली आहे.