मुंबई : रणजी क्रिकेट सामन्यांमध्ये गेस्ट प्लेअर, लोकल प्लेअर म्हणून खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोघांनी सहा मुलांना क्रिकेट असोसिएशनच्या नावाने बनावट पत्रे देत ६३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशांत कांबळे आणि देवेश उपाध्याय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून मालाड पोलीस अधिक तपास करत आहेत.
मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडचे रहिवासी असलेले संतोष चव्हाण (३२) हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असून, त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. त्यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, क्रिकेट सामन्यांच्या आयोजनादरम्यान त्यांची प्रशांत कांबळे याच्याशी रत्नागिरी येथे ओळख झाली. प्रशांत हा मुंबई संघाकडून खेळलेला असून, प्रशांत आणि संतोष हे दोघेही रत्नागिरी संघाकडून देखील क्रिकेट खेळले आहेत.
प्रशांतने त्यांची देवेश उपाध्याय नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. देवेश याची अभिनेता सोनू सुद याच्या सहाय्यकासोबत ओळख असल्याचे सांगत त्याचे बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. कोणाला रणजी ट्रॉफीमध्ये खेळवायचे असल्यास त्याने संपर्क साधण्यास सांगितले. संतोष यांनी त्यांच्या ओळखीतील सहा चांगल्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची नावे प्रशांतकडे दिली.
मुलांना गोरेगाव येथे नेट प्रॅक्टिस करण्यासाठी बोलवण्यात आले. प्रशांतने त्यांच्याशी व्यवहाराबाबत सर्व बोलणी करत रणजी ट्रॉफीमध्ये गेस्ट प्लेअर म्हणून खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, ६ मुलांनी जून २०१८ ते २०२२ पर्यंत टप्प्याटप्याने संतोष यांच्या मार्फत प्रशांत आणि देवेश यांना पैसे पाठवले. रक्कम मिळाल्यानंतर देवेश उपाध्याय याने नागालँड क्रिकेट असोसिएशन, मिजोराम क्रिकेट असोसिएशन, मणिपूर क्रिकेट असोसिएशन, बिहार क्रिकेट असोसिएशन यांच्या लेटरहेडवर सिलेक्शन लेटर दिले. मात्र, त्यांना गेस्ट प्लेअरऐवजी लोकल प्लेअर म्हणून खेळावे लागणार असल्याचे सांगितले. मात्र, मुलांना खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर मुलांनी प्रशांत आणि देवेश यांच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली.
देवेश याने पैसे पाठवत असल्याचे भासवले, पण प्रत्यक्षात पैसे परत केले नाही. याच दरम्यान, देवेशने क्रिकेट असोसिएशनच्या नावाने दिलेली सर्व पत्र ही बनावट असल्याचे उघड झाले. पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचे मुलांनी सांगताच प्रशांत याने १ लाख ५ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम न मिळाल्याने संतोष यांनी या मुलांना सोबत घेऊन मालाड पोलीस ठाणे गाठत ६३ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली आहे.