मुंबई : अनोळखी व्यक्तीने दुप्पट पैसे करून देण्याच्या दाखवलेल्या आमिषाला बळी पडून बारामतीमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुंबई भेटीदरम्यान २५ लाख रुपये गमावल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात पवई पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे पुण्यातील बारामतीचे रहिवासी आणि पेशाने वकील असलेले ५५ वर्षीय तक्रारदार सध्या शेती करतात. तक्रारदार हे चालकासोबत काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आले असताना त्यांची देवा नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने काही वर्षांपूर्वी तक्रारदार यांना बारामतीमध्ये भेटल्याची बतावणी केली. देवा याने तक्रारदाराचा विश्वास संपादन करून त्यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या बोलण्याला भुलून तक्रारदार हे पाच लाख रुपये घेऊन १८ मे रोजी मुंबईत आले. त्यांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये देवाची भेट घेतली. देवा याने तक्रारदार यांना एवढी रक्कम पुरेशी नसून २५ ते ३० लाख रुपये आणल्यास पैसे दुप्पट करून मिळतील, असे सांगितले.
देवाने तक्रारदार यांना पाचशेच्या दहा नोटा देत अशा नोटा मिळतील असे सांगितले. त्याने दुसऱ्या दिवशी तक्रारदार यांना पवई येथे बोलावून घेत पैशांबाबत विचारणा केली. तक्रारदार यांनी आपल्याकडे पाच ते सहा लाख रुपये उपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळीसुद्धा देवाने त्यांना पाचशेच्या दहा नोटा देत आणखी रक्कम घेऊन येण्यास सांगितले. एव्हाना तक्रारदार हे देवाच्या जाळ्यात पूर्ण अडकले होते.
तक्रारदार यांनी गावी जात पैशांची जुळवाजुळव सुरू केली. तक्रारदार यांनी २५ लाख रुपये सोबत घेऊन २५ मे रोजी मुंबई गाठली. यावेळी देवा त्यांना कुलाब्यातील एका हॉटेलमध्ये भेटला. पैशांचे काम पवई, हिरानंदानी हॉस्पिटल येथे होईल असे सांगून त्याने तक्रारदार यांना रिक्षाने तेथे येण्यास सांगितले.
तक्रारदार हे पैसे घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. देवाने तक्रारदार यांच्याकडून २५ लाख रुपये असलेली बॅग घेतली. तसेच त्यांना यात ५० लाख रुपये आहेत असे सांगून एक बॅग दिली. तक्रारदार यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी त्याच्या साथीदाराच्या गाडीमध्ये बसवले. या चालकाने तक्रारदार यांना काही अंतरावर उतरवले आणि पैशांच्या बॅगसह पळ काढला. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने तक्रारदार यांनी पार्कसाईट पोलीस ठाणे गाठून देवा आणि त्याच्या साथीदाराविरोधात २५ लाखांच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली आहे.