मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत राज्यामध्ये सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली असली, तरी बारामतीनंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार घोषित केलेला नसून या तीन उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरुन झाले तरी महाविकास आघाडीकडून अद्याप आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा असल्यामुळे त्यांचा निर्णय प्रलंबित आहे. शरद पवार गटाकडूनही आतापर्यंत त्यांच्या वाट्याला आलेल्या दहा पैकी सात जागांवरील उमेदवारच जाहीर करण्यात आले आहेत.
शरद पवार गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये सातारा, रावेर आणि माढा मतदारसंघातील तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल. यापैकी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप इच्छूक असल्याची माहिती आहे. तर सातारा लोकसभेतून शशिकांत शिंदे, सुनील माने किंवा पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार
वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्करराव भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरूर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके
बीड- बजरंग सोनावणे
भिवंडी- सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा