मुंबई, दि. 25: राज्यातील 12 जिल्हा परिषदां व त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 20 मार्च 2026 पूर्वी पहिल्या बैठका आयोजित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका पार पडल्या असून, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील कलम 11(1) आणि 59(1) नुसार नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे नियमानुसार पहिली बैठक वेळेत घेणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच संबंधित विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बैठकीत अध्यक्ष व सभापती पदांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अधिकृतपणे सुरू होणार आहे.







